%@LANGUAGE="VBSCRIPT" CODEPAGE="65001"%>
बकुळीचे फूल जसे सुकले तरी सुगंध देत राहते तसे काही विषय, विचार हे सदैव मनाला आल्हाद देतात. तशा विषयांवरील प्रत्येकी एक ते दीड पानांचे बकुळीच्या फुलांसारखेच लहान पण मनात दरवळणारे महान लेख 'वांग्मयशोभा'चे संपादक मनोहर केळकर यांनी आठवले यांच्याकडून लिहून घेतले. या एकवीस लेखांचा संग्रह पुस्तकरूपाने त्यांनीच प्रसिद्ध केला. अर्थात त्याचे नाव 'बकुळफुले' हेच ठेवले गेले.
या पुस्तकाचा कच्चा खर्डा केळकर यांनी आठवले मृत्यूशय्येवर असताना त्यांना दाखवला होता. प्रत्यक्ष पुस्तक आठवल्यांच्या मृत्यूनंतर बरोबर दोन महिन्यांनी प्रसिद्ध झाले. प्रार्थना, 'ओम् असतोमा सद्गमय' हा मंत्र, 'भाव तेथे देव' हे तत्त्व, नास्तिकातील आस्तिक्य, निर्भयता, आशावाद, सकारात्मक दृष्टीकोन, अशा विषयांवरचे लेख तर त्यात आहेतच पण त्या बरोबरच स्वामी रामतीर्थ, बाळकृष्णबुवा ब्रह्मचारी, शास्त्रज्ञ एडिसन अशा प्रसिद्ध, मोठया लोकांच्या जीवनातील प्रसंगही आहेत, बालकवींच्या 'तारकांचे गाणे' या कवितेवरून 'तारकोपनिषद' बनवणारा एक मित्र, एक सदाचरणी ड्रायव्हर, एक वेश्या अशा सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यातून घेण्यासारखे बोधही आहेत.