%@LANGUAGE="VBSCRIPT" CODEPAGE="65001"%>
आठवले यांचा ज्योतिष शास्त्राचा गाढा अभ्यास होता. ते या शास्त्राकडे का वळले याची कथा मजेशीर आहे. व्ही शांताराम आणि प्रभात हे भिन्न नाहीत अशी खात्री असताना ते प्रभात सोडून जाणार अशी अफवा पसरली असताना आठवले प्रभात, व्ही शांताराम आणि प्रभातचे इतर भागीदार यांच्या कुंडल्या घेऊन होराभूषण दीक्षित यांच्याकडे गेले आणि ग्रहांचे काही कारस्थान आहे का याचा शोध घेतला. पण होराभूषण यांनी वर्तवलेले भविष्य खोटे ठरले आणि व्ही शांताराम १३ एप्रिल १९४२ रोजी प्रभात सोडून गेले. अशक्य ते शक्य करणारे दैव माणसापेक्षा श्रेष्ठ आहे याचा पडताळा आला. आठवले यांनी याच्या मुळाशी जायचे ठरवले आणि त्यांनी बाजारात जाऊन ज्योतिष शास्त्रावरील पुस्तके विकत आणली. 'Astrological Magazine' नावाच्या बंगलोरहून प्रसिद्ध होणाऱ्या नियतकालिकाचे ते वर्गणीदार झाले. हस्तरेखा आणि कुंडली पाहून भविष्य सांगता येण्याइतके ज्ञान त्यांनी प्राप्त केले.
त्यांचे एक मित्र श्री, भडसावळे यांच्यामुळे त्यांचा 'नाडीग्रंथ' या ज्योतिष शास्त्रातल्या चमत्काराशी परिचय झाला. प्राचीन ऋषींनी ताम्र पट्ट्यांवर आगामी कैक पिढ्यांचे भविष्य लिहून ठेवले आहे. जन्म वेळेप्रमाणे एकेक पट्टी असते. या पट्टीवर आयुष्यात घडून गेलेला प्रसंग वर्णन केलेला असतो. ते वर्णन जर भूतकाळाशी जुळले तर योग्य ती पट्टी गवसली आहे असा निष्कर्ष काढून मग त्यावरचे भविष्य जाणून घेता येते. भडसावळे यांच्या पट्टीवर त्यांच्या सोबत आलेल्या गृहस्थांचे म्हणजेच आठवले यांचे अचूक वर्णन आलेले पाहून ते आश्चर्याने थक्क झाले. या चमत्काराचे डोळस संशोधन करायला प्रवृत्त झाले. विषयाचा पाठपुरावा करुन तसे तेरा ग्रंथ असल्याचे त्यांनी शोधले. त्या संशोधनावर आधारित पुस्तक लिहिले ते 'नाडीग्रंथ- एक अभ्यास'. हे 'मनोहर ग्रंथमाले'चे प्रकाशन होते.