%@LANGUAGE="VBSCRIPT" CODEPAGE="65001"%>
स्वामी विवेकानंदांनी ज्याला ईश्वर म्हणले आहे त्या ओंकाराचा सर्वांगीण अभ्यास करणारा, नावाप्रमाणे त्याचे रहस्य उलगडून दाखवणारा हा ग्रंथ आहे. संगीत ही विश्वभाषा आहे. आणि तो 'ओम्' या मूळ दिव्य ध्वनीचा मधुर अविष्कार आहे. संगीतातील स्वरलहरींचे सामर्थ्य अमोघ, अमाप असते. संगीताचा परिणाम पशुपक्ष्यांवर होतो, वनस्पतींवर होतो तसाच त्या नादब्रह्माचा परिणाम माणसाच्या मनावर, मज्जातंतुंवर आणि अंतर्मनावरही होतो.
आपल्या संस्कृतीत, स्तोत्र मंत्रात वर्णन केलेला ओंकाराचा अर्थ, त्याचे अनन्यसाधारण महत्व या बरोबरच पाश्चात्य देशात त्यावर चाललेले संशोधन आणि शास्त्रीय दृष्टीलाही पटलेली त्याची महानता या ग्रंथात वर्णन केलेली आहे. त्याची उपासना कशी करावी हे सांगितले आहे आणि अनेक साधकांचे अनुभवही कथन केले आहेत. प्रत्येक विधानाला विद्वान लेखकांच्या लिखाणाचे संदर्भ दिले आहेत आणि साधकांची नावे, पत्ते, ठावठिकाणाही दिला आहे. अभ्यासकांना एका पुस्तकात शंभर ग्रंथ वाचल्याचे समाधान मिळते याला कारण परत एकदा आठवले यांचे चौफेर वाचन आणि अभ्यासू, मुमुक्षु वृत्ती.