एका राज्याच्या राजगुरूंनी स्वत:चे महत्व राखण्यासाठी राज्याच्या कुलदेवतेला नरबळी आणि पशुबळी चढवण्याची रूढ केलेली पद्धत राजा बंद करवतो. चिडलेला राजगुरू राजावर मारेकरी घालतो. राजगुरूंनी आयत्या वेळी केलेल्या विश्वासघातामुळे मारेकरी पकडला जातो. त्याचा पुत्र आणि कन्या राजकन्येच्या सहाय्याने राजगुरूंचे सगळे कट हाणून पाडून त्यांचं निप्पात करतात अशी बाळबोध कथा असलेले हे चित्र त्यातील भव्य सेट, आणि कल्पक दिग्दर्शन यामुळे एक उत्तम चित्रपट बनले आहे.
राजगुरूची मध्यवर्ती भूमिका केशवराव दाते यांनी त्यांच्या अभिनयकौशल्याने अजरामर केली आहे. व्ही शांताराम यांनी दात्यांच्या भेदक डोळ्यांचा अतिशय परिणामकारक उपयोग करून घेतला आहे. सबंध पडदाभर फक्त एक डोळा दिसतो आणि त्यात समोर घडणाऱ्या हालचाली दिसतात आणि शेवटी राजगुरू स्वत:चा डोळा फोडून घेतो असे दोन चित्तथरारक प्रसंग शांतारामबापुंनी पंचाहत्तर वर्षांपूर्वी चित्रित केले आहेत ते पाहणं हा अनुभव घेतलाच पाहिजे असा आहे.
यातील गाणी नाटकी थाटाची झाली आहेत, अशी कबुली खुद्द आठवले यांनीच दिलखुलासपणे दिली आहे.