१९१० - २०१० जन्मशताब्दीवर्ष (1910 – 2010 Centenary Year)
जन्म: २१ जानेवारी १९१० - मृत्यू: २ मे १९७५

साखरझोप

शांताराम आठवले यांचा जन्म पुणे येथे २१ जानेवारी १९१० रोजी झाला.

आठवल्यांचे वडील ग्वाल्हेरच्या सरदार शितोळे यांचे पुण्यातील कारभारी होते. त्यांना साहित्य आणि कला यात खूप रस होता. त्यांचा आवाज सुरेल होता आणि त्यांना संगीताची विशेष ओढ होती. ते लळीते करीत आणि त्यांनी लावणी गायनात प्राविण्य मिळवले होते. त्यांचे वाचन दांडगे होते. एखाद्या कसलेल्या नटाप्रमाणे स्वच्छ, रसानुकुल आणि नादमय अशी त्यांची वाचनशैली होती. त्यांची नाटकात जाण्याची इच्छा मात्र अपुरी राहिली होती.

आठवल्यांची आई साक्षर नव्हती पण सुसंकृत होती. तिला लिहिता वाचता येत नव्हते पण तिच्या जिभेवर साक्षात सरस्वती होती. जुन्या ओव्या, घरगुती पारमार्थिक गाणी यांचा न संपणारा साठाच तिच्याजवळ होता. ती जात्यावर बसली की तिच्या समोर बसायचे, फिरत्या खुंट्याला हात द्यायचा आणि तिच्या सुरेल ओव्या लक्षपूर्वक ऐकत मनात साठवायच्या हा छोट्या शांतारामाचा परिपाठ असे.

आठवल्यांचे शिक्षण पुण्याच्या भावेस्कूल मध्ये झाले. ओकशास्त्री हे संस्कृत भाषेचे गाढे पंडित, माधवराव पटवर्धन हे रविकिरण मंडळातले कवी, वा भा पाठक हे साहित्यिक, बापूसाहेब किंकर हे इंग्रजी भाषेचे विद्वान यांच्यासारखे शिक्षक त्यांना लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत असतानाच आठवले यांनी भाषांवर प्रभुत्व मिळवले. त्याच वेळी त्यांच्या कविता नियतकालिकात प्रसिद्ध होऊ लागल्या. हस्तलिखिते, मासिके, वक्तृत्वस्पर्धा यातही ते भाग घेत. वाचन, लिखाण यांच्या बरोबरच बेबंदशाही, शिवसंभव या सारख्या नाटकात अभिनय करुन आणि ती दिग्दर्शितही करुन ती क्षेत्रेही आठवल्यांनी शाळेत असतानाच गाजवली.

१९२६ ते १९३१ या काळात त्यांनी शाकुंतल ते खडाष्टक अशी रंगभूमीवरील सर्व नाटके मनमुराद बघितली. त्यांचे चुलतबंधु यशवंतराव आठवले गंधर्व नाटक मंडळीत नट होते. त्यांची नाटके तर ते पाहतच पण त्यांच्याबरोबर नाटक मंडळीच्या बिऱ्हाडी जाऊन त्यांच्या तालमी, जेवणावळी यांचीही मजा अनुभवत. आठवल्यांना शितोळे वाड्याच्या दिवाणखान्यात उत्कृष्ट दर्जाची लावणी ऐकायला मिळाली. डोक्यावर आणि हाताच्या तळव्यावर जळत्या समया घेऊन केलेले बहारदार लावणीनृत्यही पाहायला मिळाले. वाड्यावर पेशवाईतील सुप्रसिद्ध शाहीर सगनभाऊ यांची पुण्यतिथी साजरी होत असे. साऱ्या महाराष्ट्रातील शाहीर, तमासगीर, लावणीकार तेथे हजेरी लावत. लोकगीतांचे समृद्ध भांडार आठवले यांना खुले झाले होते.

कला आणि साहित्य यात जेवढी गती होती तेवढेच त्यांचे गणिताशी वाकडे होते, त्यामुळे १९२८ साली शालांत परीक्षेत गणित हा विषय राहिला. १९२९ साली वडिलांना पक्षाघात झाला आणि त्यातच त्याचा दु:खद अंत झाला. त्यामुळे आठवले यांना १९३० साली परीक्षेला परत बसून उत्तीर्ण होता आले. त्यांना कॉलेजमध्ये एकच वर्ष जाता आले.

१९३१ साली आठवले कुटुंब पुण्याहून कोलवडी या त्यांच्या वतनाच्या गावी आले. कोलवडी आणि अष्टविनायकाचे स्थान थेऊर यांच्यामध्ये नदी वाहते. त्या नदीच्या काठी आठवले कुटुंबाचे घर आणि शेत होते. घराच्या ओटीवरच विठ्ठल रखुमाईचे देऊळ होते. दर गुरवारी, शनिवारी, एकादशी, शिवरात्र, सणावारी देवळात भजन होई. टाळ, मृदुंग, वीणा यांच्या जयघोषात विठ्ठलाच्या नावाचा होणारा गजर अंत:करणात गजबज निर्माण करी. ज्ञानदेव, नामदेव, तुकाराम यांची अमृतवाणी कानावर पडत राही. सणावाराला किंवा उत्सवाच्या वेळी 'अखंड पहारा' असे. त्यावेळी होणारा नामाचा गजर मनाच्या गगनात भरून राही. दळण दळून, नदीवरून पाणी आणून देऊन आईला मदत करणे, गाईना चरायला घेऊन जाणे, गावात सत्यनारायणाची पूजा सांगणे, लग्न लावणे अशी गाव जोशीपणाची कामे करणे, या खेरीजचा मोकळा वेळ आठवले नदीकाठी घालवीत. नदीचा शांत प्रसन्न प्रवाह, मधूनच उडत जाणारी बगळ्यांची माळ, पलिकडच्या तीरावर गुरांच्या गळ्यातल्या वाजणाऱ्या मंजुळ घंटा, एखाद्या गुराख्याच्या बासरीचे मधुर सूर. रात्री चंद्र चांदण्यांबरोबर आठवलेही नावेतून पाण्यात विहार करीत. निसर्ग त्यांच्या मनात घर करुन राहिला तो इथेच.

सुप्रसिद्ध कादंबरीकार ना ह आपटे यांची आणि आठवले यांची पत्रमैत्री होती. आपटे यांना कोरेगावला त्यांच्या 'मधुकर' या मासिकाचे संपादनसहाय्य आणि त्यांच्या मुद्रणालयाचे काम यांसाठी आठवले यांच्यासारखाच माणूस हवा होता आणि आठवले यांनाही उपजीविकेचे साधन हवे होते. आठवले यांनी कोलवडीला रामराम ठोकला आणि कोरेगाव गाठले.

चित्रपट गीते (Film Songs)

साठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा

(You can read, hear and see these and many similar songs)

  1. आधी बीज एकले - संत तुकाराम
  2. दोन घडीचा डाव - रामशास्त्री
  3. लख लख चंदेरी - शेजारी
  4. मन सुद्ध तुझं - कुंकू
  5. सुख देवासी मागावे - शेवग्याच्या शेंगा
  6. तू नसतीस तर - वहिनींच्या बांगड्या
  7. बघत राहू दे तुझ्याकडे - सुभद्राहरण
  8. तुझा नि माझा एकपणा - भावगीत

कविता (Poems)

"नाही धोका वेगे हाका"
"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता"
"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा"

कवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:

नक्षत्रांचे गाणे

“याला जीवन ऐसे नाव”

  1. नक्षत्रांचे गाणे - शांताराम आठवले - भाग १



  2. नक्षत्रांचे गाणे - शांताराम आठवले - भाग 2



  3. चंद्रा थांबू नको गगनात - शांताराम आठवले