१९१० - २०१० जन्मशताब्दीवर्ष (1910 – 2010 Centenary Year)
जन्म: २१ जानेवारी १९१० - मृत्यू: २ मे १९७५

काव्य आणि कविता

आठवले यांच्या काव्यगुणांचा प्रत्यय ते शाळेत असल्यापासूनच येऊ लागला होता. त्यांचे शिक्षक – इंग्लिश शिकवणारे रविकिरणमंडळातील 'सूर्य' माधवराव पटवर्धन, संस्कृतची गोडी लावणारे ओकशास्त्री, मराठी काव्याशी ओळख करुण देणारे वा.भा.पाठक, इंग्लिश काव्याचा छंद लावणारे आणि काव्यगुणांना सक्रीय उत्तेजन देणारे बापूसाहेब किंकर गुरुजी यांच्या मार्गदर्शनामुळे, प्रोत्साहनामुळे आठवले लिहू लागले, लिहीत राहिले. त्यांच्या आईने केलेले जुन्या ओव्या, घरगुती पारमार्थिक गाणी यांचे संस्कारही उपयोगी पडले. ते ज्या सरदार शितोळ्यांच्या वाड्यात रहात त्याच्या दिवाणखान्यात अनेक लोककला सादर होत. विशेषत: लावणी. पेशवाईतील सुप्रसिद्ध शाहीर सगनभाऊ यांची पुण्यतिथी दरवर्षी साजरी केली जाई. त्यावेळी साऱ्या महाराष्ट्रातील तमासगीर, लावणीकार हजेरी लावत. त्यामुळे पोवाडे, वग, लावण्या अशा लोकगीतांचे समृद्ध भांडार त्यांना त्यांच्या काना मनात साठवता आले. त्यांच्या कोलवडी या गावच्या घराच्या ओसरीतच विठ्ठलाचे देऊळ होते. तिथे कीर्तने, प्रवचने, आख्याने होत. मनातल्या काव्य बीजाला या सगळ्या व्यक्ती, प्रसंग, गोष्टी यांनी खत पाणी घातले आणि ते अंकुरले, वाढले, फोफावले. त्यातून निघालेल्या कोटी तरू आणि कोटी सुमने फळे यांनी लाखो रसिकांना परम आनंद दिला.

जवळ जवळ तीनशे चित्रपट गीतांखेरीज त्यांनी अन्य कविताही लिहिल्या.

त्यांच्या कवितांचा पहिला संग्रह 'एकले बीज' या नावाने १९३८ साली म्हणजे ते प्रभातकवी झाल्यानंतर प्रसिद्ध झाला. त्या पाठोपाठ १९४० साली 'बीजांकुर' हा दुसरा प्रसिद्ध झाला. 'सकाळ', 'स्वराज्य' ही वर्तमानपत्रे, 'मनोहर', 'वांग्मयशोभा' यांसारख्या मासिकात, 'शालापत्रक' या लहान मुलांच्या मासिकात त्यांच्या कविता नेहमी प्रसिद्ध होत असत. साध्या, सोप्या, अर्थपूर्ण गीते हे खास वैशिष्ठ्य असलेल्या आठवल्यांची कविता मात्र बुद्धीची उंची, विचारांची खोली, अनुभवांचा विस्तार याने आलेल्या सुजाणपणाला कल्पनाशक्तीची जोड मिळाल्याने अंगी मुरलेल्या निर्भेळ, खेळकर विनोदाने नटलेली आहे. त्यात चिमटे नाहीत, गुदगुल्या आहेत, एक निरोगी मिस्किलपणा आहे. त्या वाचल्यावर वाचकांना स्वानुभवाचा, किंवा अव्यक्त भावनांचा प्रत्यय येऊन हमखास खुदकन हसायला येते. या कविता एका ओळीच्या, दोन ओळींच्या, तीन ओळींच्या चार ओळींच्या अशाही आहेत. कोणतीही गोष्ट अगदी कमी शब्दात प्रकर्षाने व्यक्त करणे हे अत्यंत अवघड, कौशल्याचे काम आहे, येरा गबाळाचे नोहे! दुसऱ्या महायुद्धाचा कुणावर काय परिणाम झाला असेल तो असो, आठवले यांच्या विनोदबुद्धीने केलेले एक मनोरंजक निरीक्षण वाचण्यासारखे आहे. कवितेचे शीर्षक आहे 'नाझी आजी'.

Shantaram Athavale with grandchildren Rajeev and Vrundaशिके मराठी यत्ता तिसरी
तरी वाचतो काळ, केसरी
दादांचा तो बाळ लाडका
हुशार चौकस गोड बोलका.

एके दिवशी पित्यास सांगे
"गट्टी करा फू आजीसंगे
जर्मन अपुले शत्रू असती
त्यांच्यासंगे ठेवी मैत्री
स्वस्तिक काढी रोज सकाळी
नाझी आहे आजी अपुली!!"

ज्या दिवशी भारतात दशमान पद्धतीची नाणी 'नवा पैसा' म्हणून चलनात आली त्याच दिवशी 'स्वराज्य'मध्ये आठवले यांची ही दोन ओळींची कविता प्रसिद्ध झाली :

जीर्ण जीवनी उमले आशा
हाती येईल 'नवीन पैसा' !

याच मिस्कीलपणाने, रसिकपणाने त्यांनी आपल्या जीवनातील काही आनंदाचे क्षण टिपून ते काव्यात वाचकांपुढे ठेवले. त्याला शीर्षक दिले "अहा तो क्षण आनंदाचा!" ते वाचताना 'खरंच, हा अनुभव माझाही आहे!' असा प्रत्यय बऱ्याच लोकांना येईल आणि त्याच्या पुन:प्रत्ययाचा मजेशीर आनंद मिळेल.

Shantaram Athavale with his granddaughter Asmitaआठवले यांना लहान मुलांचे भारी वेड. त्यांच्या तीन मुलांसाठी, आजूबाजूच्या बालचमूंसाठी, पुढे त्यांच्या नातवंडांसाठी त्यांनी अनेक बालगीते, बडबडगीते, बोधगीते लिहिली. एखाद्या छोट्याला कडेवर घेऊन रस्त्यावर हम्मा, शेळी, इंजिन दाखवत, गाणी गात जाणारे मुलांचे लाडके 'तात्या' हे अगदी नेहमीचे दृष्य असे. त्यांच्या या आवडीमुळेच त्यांची चित्रपटांसाठी लिहिलेली सर्व अंगाईगीते अतिशय प्रेमळ, लडिवाळ आणि अर्थगर्भ आहेत. त्यांची मुले शाळेत शिकत असताना येणारे विषय कित्येकदा ते कवितेत समजावून देत. उदाहरण द्यायचे झाले तर अकबर राजाचा नवरत्न दरबारातील रत्नांची नावे आणि त्यांचे कार्य त्यांनी एका कवितेत गुंफले होते. इंग्लिश कवितांचे अर्थ ते त्यांची सहजपणे भाषांतरे करुन समजावून सांगत.

चित्रपट गीते (Film Songs)

साठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा

(You can read, hear and see these and many similar songs)

  1. आधी बीज एकले - संत तुकाराम
  2. दोन घडीचा डाव - रामशास्त्री
  3. लख लख चंदेरी - शेजारी
  4. मन सुद्ध तुझं - कुंकू
  5. सुख देवासी मागावे - शेवग्याच्या शेंगा
  6. तू नसतीस तर - वहिनींच्या बांगड्या
  7. बघत राहू दे तुझ्याकडे - सुभद्राहरण
  8. तुझा नि माझा एकपणा - भावगीत

कविता (Poems)

"नाही धोका वेगे हाका"
"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता"
"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा"

कवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:

नक्षत्रांचे गाणे

“याला जीवन ऐसे नाव”

  1. नक्षत्रांचे गाणे - शांताराम आठवले - भाग १



  2. नक्षत्रांचे गाणे - शांताराम आठवले - भाग 2



  3. चंद्रा थांबू नको गगनात - शांताराम आठवले