१९१० - २०१० जन्मशताब्दीवर्ष (1910 – 2010 Centenary Year)
जन्म: २१ जानेवारी १९१० - मृत्यू: २ मे १९७५

मध्यान्ह

"प्रभातकाल" संपला. डोक्यावरील मातृवत संस्थेचे छायाछत्र हिरावले. पदरी पत्नी आणि तीन मुले होती. उपजीविकेचे साधन शोधणे गरजेचे होते.

राजा नेने, केशवराव भोळे या प्रभातमधून बाहेर पडलेल्या समविचारी शिलेदारांनी एकत्र येऊन 'नवप्रभात' घडविण्याचे प्रयत्न केले. 'तारामती', 'बच्चोंका खेल', 'फिर भी अपना है' असे काही चित्रपट निर्माणही केले पण त्यांना यश लाभले नाही. 'प्रभात' परंपरेला साजेसे, सशक्त कथांवर आधारलेले, आशयगर्भ आणि कलासंपन्न असे चित्रपट आपण स्वत:च निर्माण केले पाहिजेत या निर्णयाप्रत आठवले आले. पहिल्या स्वत:च्या, स्वतंत्र कलाकृतीसाठी कथा श्री. ना ह आपटे यांची असणे साहजिक आणि सयुक्तिक होते. चित्रपट तयार करणे ही गोष्ट आठवले यांच्यासाठी अवघड नव्हती, अडचण असणार होती भांडवलाची, चिंता होती पैशांची, जी प्रभातमध्ये असताना कधीच जाणवली नव्हती. त्यासंबंधीचे ज्ञानही मिळवलेले नव्हते. आठवले आणि ना. ह. आपटे यांनी मिळून यावर एक आगळा वेगळा उपाय शोधला. आपटे यांचे एक सधन नातेवाईक श्री. टापरे, जे सराफाचा व्यवसाय करीत, यांना बरोबर घेऊन त्यांनी एक सहकारी संस्था स्थापन केली. नाव होते "भारत चित्र दर्शन." त्या सहकारी संस्थेसाठी रसिकांकडून ठेवींच्या स्वरुपात भांडवल गोळा केले गेले. प्रतिसाद उदंड लाभला आणि तोही साहित्य सम्राट तात्यासाहेब केळकर यांच्यासारख्या मान्यवरांकडून !

"पाच ते पाच" ही ना.ह.आपटे यांची कथा निश्चित केली आणि प्रभातच्या सृजन पण काटेकोर कलात्मकतेने, उत्तम तंत्राने, आणि त्याच झपाटयाने "भाग्यरेखा" हा अप्रतिम चित्रपट तयार केला. १९४२ सालच्या चळवळीतील भूमिगत क्रांतिकारकांचे खडतर साहसी जीवन, सामान्यांचा त्यांना मिळालेला सक्रीय, धाडसी पाठिंबा अशी राजकीय पार्श्वभूमी, भाकरीमोर्चा सारखे सामाजिक लढे, आदर्श, ध्येयनिष्ठ प्रेम, मोहाच्या क्षणातून उद्भवलेला कुमारी माता हा पेचप्रसंग दाखवणारे आणि "निर्भयतेने जीवन जग" असा संदेश देणारे हे चित्र होते. पटकथा, गीते आणि दिग्दर्शन या जबाबदाऱ्या आठवले यांनी उचलल्या. केशवराव भोळे यांनी श्रीधर पार्सेकर या तरुण संगीतकाराबरोबर आठवल्यांच्या गीतांना संगीताने नटवले. शांता आपटे, बाबुराव पेंढारकर यांसारख्या कसलेल्या कलाकारांसोबत पु.ल.देशपांडे यांनीही या चित्रपटात भूमिका केली होती. तो त्यांचा दुसराच चित्रपट होता.

पण 'भाग्यरेखे'चे आणि पर्यायाने आठवले यांचे 'भाग्य' चांगले नव्हते. असा सर्वांगसुंदर, जीव ओतून तयार केलेला चित्रपट मोठ्या दिमाखात प्रदर्शित झाला आणि दुर्दैवाने गांधीवध झाला. दंगे, जाळपोळ यात चित्रपटाची वाताहात झाली. 'भाग्यरेखा' 'अभाग्यरेखा' ठरली. सहकारी संस्थाही तोट्यात गेली. ठेवीदारांचे पैसे परत करता करता भागीदारांच्या नाकी नऊ आले. आठवले कितीतरी वर्षे ते ओझे उरावर आणि पाठीवर वागवीत होते. शेवटी कोर्टात नादारी जाहीर करण्याची नामुष्की पत्करून त्यांना यातून सुटका करुन घ्यावी लागली. पहिल्याच पावलावर अशी जिव्हारी जखम झाली त्यामुळे धीर खचणे स्वाभाविक होते पण 'मन सुद्ध तुझं, गोस्त हाये प्रिथ्वीमोलाची तू चाल पुढं तुला रे गड्या भीती कशाची' या स्वत:च्याच शिकवणुकीनुसार आठवले यांनी कंबर कसली आणि प्रयत्न चालू ठेवले.

मकरंद फिल्म्स नावाच्या कंपनीत नोकरी करताना "मै अबला नहीं हुं" या नावाचा शांता आपटे यांचीच प्रमुख भूमिका असलेला एक हिंदी चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला. ती नोकरीही अल्पकालीन ठरली.

'प्रभात' नावाच्या गुरुकुलात, व्ही शांताराम यांच्यासारख्या सिद्धहस्त गुरूंकडून प्राप्त केलेले चित्रपटनिर्मितीच्या सर्व अंगांचे समग्र ज्ञान आणि त्या गुरुकुलाची तेजस्वी परंपरा याबद्दलचा सार्थ अभिमान, स्वकर्तृत्वाची जाणीव या दोन्हीमधून आलेला स्पष्टवक्तेपणा, कलेच्या पायमल्ली विषयीची चीड, कोवळे आणि संवेदनाक्षम कविमन, सचोटी, असत्य आणि अन्याय याबद्दलचा राग असे अनेक गुण – चित्रपटसृष्टीच्या धंदेवाईक, व्यवहारी, पैशाच्या दुनियेत दुर्गुण ठरले. त्यामुळे सतत मानहानी आणि अपयश यांना तोंड द्यावे लागले.

या काळात आठवले बराच काळ मुंबईत असत. पैशाची चणचण असे. शारदेशी जास्त जवळीक असल्याने लक्ष्मी त्यांच्यावर सहसा रुष्टच राहिली. या सवतींच्या भांडणाचा सर्वात जास्त त्रास त्यांच्या पत्नीला होई. आठवले यांच्या पत्नी नावाच्या 'सुमती' नव्हत्या, खरोखरच 'सु मती' होत्या.Sumati Athavale आपल्या पतीच्या कर्तृत्वावर त्यांचा विश्वास होता आणि त्याचा अभिमानही. त्यांनी मोठया हिमतीने, धीराने, काटकसरीने संसार केला. कोणत्याही बऱ्या वाईट परिस्थितीत त्यांनी घर सांभाळले. मंगला, अभया आणि सुदर्शन या तिन्ही मुलांना मोठे केले. व्यवहाराच्या, संसाराच्या व्यापतापांचा जरासाही संसर्ग आठवल्यांच्या प्रतिभेला, कविमनाला पोचणार नाही याची त्यांनी कायम खबरदारी घेतली. आठवल्यांना कधी रेशनच्या रांगेत उभे राहावे लागले नाही की मुलांच्या आजारीपणाची चिंता करावी लागली नाही. आर्थिक टंचाई असतानाही कोंड्याचा मांडा करून, रोजची भाजी भाकरी सुमतीबाई यांनी मुलांच्या तोंडात घातली. त्यांचे कष्ट, हाल अपेष्टा यांचे चीज व्हायचे ते नवऱ्याने अप्रतिम चित्राची निर्मिती केली की !

हातात चित्रपट नसला तरी गाण्यांचे काम मिळायचे. प्रभातपासून एच.एम.व्ही.शी जुळलेले संबंध पुढेही बराच काळ टिकून राहिले. त्या ध्वनिमुद्रिका बनत राहिल्या. त्याखेरीज 'श्री गुरुदेवदत्त', 'झंझावात', 'संत भानुदास', 'मर्द मराठा', 'बेलभंडार', 'गोकुळचा राजा', 'विठ्ठलपायी' अशा अनेक चित्रपटांसाठी त्यांनी गाणी लिहिली. दत्ता डावजेकर, स्नेहल भाटकर, वसंत पवार, आणि पु.ल.देशपांडे या संगीतकारांनी त्यांना संगीताचा साज चढवला. त्यापैकी 'बेलभंडार' ची दत्ता डावजेकर यांनी संगीत दिलेली 'वय माझं सोळा जवानीचा मळा बहरुनी आला' हे क्लब मधील उडते गीत, 'नका बोलू असे दूर दूर बसून' ही बैठकीची लावणी, 'झोप घे रे चिमण्या सरदारा' हे अंगाईगीत आणि 'मी नंदनवनी फिरते' आणि 'नंदाच्या पोरा तुझी रीत नव्हे चांगली' ही गीते आणि 'झंझावात' या चित्रातील संगीतकार पी रमाकांत यांचे 'दैवा तुला जोडीले हात' हे एक गीत उपलब्ध आहेत. पुढच्या काळात आठवले यांनी होमी वाडिया यांनी निर्मिलेल्या 'सुभद्राहरण' या चित्रासाठी लिहिलेली आणि वसंत पवार आणि प्रभाकर जोग यांनी संगीत दिलेली गीते आजही अत्यंत लोकप्रिय आहेत.'आला वसंत ऋतु आला', 'उमलली एक नवी भावना' 'कुणाला सांगू माझी व्यथा', एकटी मी एकटी', 'बघत राहू दे तुझ्याकडे' ही सर्वच्या सर्व गाणी श्रवणीय आहेत.

ज्या दोन चित्रपटांनी आठवले यांना लोकमान्यता मिळाली त्यातील पहिला होता १९५२ मध्ये प्रदर्शित झालेला "वहिनींच्या बांगडया". सदाशिव जे रावकवी यांच्या 'चित्रसहकार' या निर्मिती संस्थेसाठी य.गो.जोशी यांच्या कथेवरील या चित्राने पंचवीस चित्रपटगृहात प्रत्येकी पंचवीस आठवडे चालण्याचा विक्रम केला. त्याच बरोबर संपूर्ण चित्र फक्त पस्तीस दिवसात मुहूर्तापासून सेन्सॉरपर्यंत पूर्ण करण्याचाही विक्रम आठवले यांनी केला. चित्रीकरणाचे अभ्यासपूर्ण संयोजन आणि तंत्रावरील प्रभुत्व या आठवले यांच्या गुणांमुळेच ते शक्य झाले.

Winning Team of Vahininchya Bangdya and Shevgyachya Shenga - L to R: Y. G. Joshi (Story Writer), Shantaram Athavale (Director), Sadashiv J Rao Kavi (Producer)या चित्राच्या उत्तुंग यशाने उत्साहित होऊन त्या यशस्वी त्रयीने य.गो.जोशी यांच्याच 'शेवग्याच्या शेंगा' या कथेवर एक अकृत्रिम कौटुंबिक चित्रपट तयार केला. आणि त्याने आधीच्या चित्राच्या यशाचा उच्चांक मोडला.
या चित्राला फ्रान्समधील कॅन्स (Cannes Film Festival) या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (Critic Award) बक्षीस मिळाले. या चित्रपटाचा दिल्लीतील प्रीमियर भारताचे त्या वेळचे राष्ट्राध्यक्ष सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत झाला होता. या चित्रपटाची प्रत कुठेही उपलब्ध नाही.

Team of Sansar Karaychay Mala - L to R: Shantaram Athavale (Director) , Zunzunwala (Producer), Baby Shakuntala (Actress), Vivek (Actor), Bamb (Producer)या दोन यशस्वी आणि लोकप्रिय चित्रपटांच्या मधल्या काळात आठवल्यांनी परत एकदा ना.ह.आपटे यांच्या 'कलंकशोभा' या कादंबरीवर आधारित 'संसार करायचाय मला' (१९५४) या चित्रपटाची निर्मिती, दिग्दर्शन आणि पद्यलेखन केले. नायकिणीने प्रेमात पडून संसार करायचा घेतलेला निर्णय आणि त्याचे दुर्दैवी पर्यवसान असा चाकोरीबाहेरचा विषय यात हाताळला होता. इंदिरा चटणीस यांची घरंदाज नायकिणीची वेगळी भूमिका, बेबी शकुंतला हिचा सुंदर अभिनय आणि राम कदम यांनी स्वरबद्ध केलेली निरातिशय सुमधुर गाणी ही या चित्रपटाची वैशिष्ठ्ये होती. दुर्दैवाने तो कलात्मक चित्रपट व्यवहारी यश मिळवू शकला नाही. त्यातील गाणीही कुठल्याही स्वरुपात उपलब्ध नाहीत.

चांगली माणसे, उत्तम कथा, पैशापेक्षा कलेला जास्त महत्व, आणि दिग्दर्शकाला संपूर्ण स्वांतंत्र्य या गोष्टी असल्या तरच आठवले काम करू शकायचे. कलेची पायमल्ली आणि ती जर पैशासाठी किंवा तो पैसा बाळगणाऱ्याच्या लहरीसाठी झाली, दिग्दर्शकाच्या निर्णयात बदल होऊ लागले, त्याचे हक्क डावलले गेले तर हा मानी कलाकार चित्रपट अर्धवट सोडून, मोबदल्याची फिकीर न करता निघून येई. या विचित्र धंद्यात त्यांनी पूर्ण केलेल्या कलाकृतींपेक्षा मधेच सोडलेले चित्रपट जास्त होते.

असाच एक चित्रपट होता वि वि बोकील यांच्या कथेवर आधारलेला 'बेबी'. (१९५४) यात बेबी शकुंतला याच नायिका होत्या. काही गाणी रेकॉर्ड झाली होती, काही भागही चित्रित झाला होता. निर्मात्याने केलेली एक कलाकार बदलण्याची अवाजवी सूचना आठवले यांना अमान्य झाली, त्यांनी चित्रपट अर्धवट सोडून दिला. त्या चित्रासाठी लिहिलेले पण त्यात नंतर न घेतलेले, वसंत पवारांनी संगीतबद्ध केलेले माणिक वर्मा यांनी गायलेले एक गीत एच.एम.व्ही.ने ध्वनीमुद्रित केले. आजही ते गीत अत्यंत लोकप्रिय भावगीतात मोडते. शब्द आहेत : 'तुझा नी माझा एकपणा, कसा कळावा शब्दांना'.

परिस्थिती तत्त्वांना, स्वाभिमानाला मुरड घालायला लावते. जबाबदारी माणसाला लाचार बनवते. याला अपयश म्हणण्यापेक्षा तडजोड म्हणावे लागेल. संसाराचा गाडा आणि मुलांची शिक्षणे चालू ठेवण्यासाठी आठवले यांनी 'फिल्मिस्तान' या हिंदी चित्रपट निर्माण करणाऱ्या प्रसिद्ध निर्मितीसंस्थेत नोकरी पत्करली. मालक तोलाराम जालन यांनी मराठी चित्रपट करण्याचे ठरवले आणि त्यासाठी अनेक गुणी पण गरजू अशा मराठीतील मातब्बर कलाकारांना मासिक वेतनावर आपल्या 'पदरी' ठेवले. त्यांनी नोकरी करता करता चित्रपट बनवून द्यायचा होता.

लहानपणी मनात घर केलेले गंधर्व नाटक मंडळीतील वातावरण आणि बालगंधर्व आणि केशवराव भोसले यांच्या 'संयुक्त मानापमान'चा प्रयोग या पार्श्वभूमीवरील, नाट्यसृष्टीचे वैभव पडद्यावर आणणारा 'पडदा' हा चित्रपट आठवल्यांनी फिल्मिस्तानसाठी बनवला.

फिल्मिस्तानमध्येच आठवले यांच्या एका सहकार्याने दिग्दर्शित केलेल्या 'आई मला क्षमा कर' या चित्रासाठी त्यांनी गीते लिहिली आणि त्यात एक ख्रिश्चन पाद्र्याची भूमिकाही केली. राम कदम यांचेच संगीत होते. त्यातील सुधीर फडके यांच्या आवाजातील 'आई आई ए आई' हे गाणे ऐकलेच पाहिजे असे आहे. त्यातील 'नाचते काही तरी गे अंतरी माझ्या नवे' हे द्वंद्वगीत अतिशय वेगळे आणि म्हणून वैशिष्ठ्यपूर्ण आहे. सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी ते गायले आहे.

फिल्मिस्तानच्या वातावरणात होत असलेली घुसमट असह्य झाली. त्याच वेळी 'फिल्म्स डिव्हिजन' चे बोलावणे आले ते आठवल्यांनी स्वीकारले. सरकारी खाक्या सांभाळूनही आठवल्यांनी तिथेही आपला ठसा उमटवलाच. भारतीय टपालखात्यासाठी पाच मिनिटे अवधीची अतिलघु चित्रे त्यांनी अतिशय कल्पकतेने तयार केली. आसामची लोकगीते, लोकनृत्ये आणि राजस्थान मधील पाणी प्रश्न या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंटरिज कोणत्याही चित्रपटाहून कमी नव्हत्या.

निर्माते ना बा कामत यांनी त्यावेळचे प्रसिद्ध ग्रामिण कथालेखक शंकर पाटील यांच्या एका कथेवर तमाशा नसलेला ग्रामीण चित्रपट तयार करण्याची योजना आठवले यांच्यासमोर ठेवली. आठवले यांनी फिल्म्स डिव्हिजन सोडली आणि ती जबाबदारी स्वीकारली आणि ती अशी काही पार पाडली की त्यांनी त्या कथेवर तयार केलेल्या 'वावटळ' या चित्राला पु.ल.देशपांडे, गजानन जहागीरदार आणि विश्राम बेडेकर यांसारख्या दिग्गजांनी १९६५ - १९६६ सालच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान दिला. महाराष्ट्र सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या पारितोषिकातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक हे पारितोषिक तर आठवले यांना मिळालेच पण सर्वोत्कृष्ट संकलन इत्यादी दहाहून अधिक तांत्रिक अंगांची पारितोषिकेही या चित्राने मिळवली.

लोकमान्यता आणि राजमान्यता मिळाली होती. मुलांची शिक्षणे पार पडली होती. कलानंदाच्या सावलीपेक्षा व्यवहाराचे उन अधिक असलेल्या चित्रपटसृष्टीचा आठवले यांनी सानंद निरोप घेतला. आपली चित्रपटसृष्टीतील तीस वर्षांची कारकीर्द स्वेच्छेने संपवली.

चित्रपट गीते (Film Songs)

साठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा

(You can read, hear and see these and many similar songs)

  1. आधी बीज एकले - संत तुकाराम
  2. दोन घडीचा डाव - रामशास्त्री
  3. लख लख चंदेरी - शेजारी
  4. मन सुद्ध तुझं - कुंकू
  5. सुख देवासी मागावे - शेवग्याच्या शेंगा
  6. तू नसतीस तर - वहिनींच्या बांगड्या
  7. बघत राहू दे तुझ्याकडे - सुभद्राहरण
  8. तुझा नि माझा एकपणा - भावगीत

कविता (Poems)

"नाही धोका वेगे हाका"
"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता"
"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा"

कवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:

नक्षत्रांचे गाणे

“याला जीवन ऐसे नाव”

  1. नक्षत्रांचे गाणे - शांताराम आठवले - भाग १



  2. नक्षत्रांचे गाणे - शांताराम आठवले - भाग 2



  3. चंद्रा थांबू नको गगनात - शांताराम आठवले